Text

All posts/experiences/articles has been written and published by मनस्वी राजन( Rajan / Rajendra). Kindly leave your feedback and encourage me to write more and more.
Request you to do not copy and Paste this write-up for any use. All write-up (articles) has been protected by Copy Rights Act.
Do write your honest comment.

Yours,
RaJaN

Sunday, July 24, 2011

छोट्या आणि रामा बोकड

छोट्या आणि रामा बोकड

एकेमेकांशी असलेले नातं,प्रेम,ऋणानुबंध यांचा थोडक्यात अर्थ म्हणजे दोन किंवा त्याहून जास्त व्यक्तींची असणारी एकमेकांबद्दल समज,गरज, आस्था आणि अपूर्णता. इतक्या सहज ह्या वस्तुस्थितीची व्याख्या करण तसं खूप अवघड आहे. 
आमच्या गावाला शेजारी राहणा-या शेतकरी कुटुंबामध्ये चार गायी होत्या. चारही गायी अगदी मारक्या, पण वयाची ८० उलटून गेलेले आजोबा त्यांच्या जवळ आले की सगळ्याच्या सगळ्या जणी त्यांना चाटायला सुरवात करायच्या. अजब केमिस्ट्री होती त्यांची आजोबांबरोबर. आजोबा त्यांच्या बरोबर बोलायचे सुध्दा "हं....जास्त लाडात येऊ नकोस. लई तशी नख-याची हायेस तु…" , "मला समद कळतया कशासाठी आरडा-ओरडा चाललाय…थोडासुदिक उशीर झाला चा-याला की झाली चालू तुमची बोंबाबोंब..","मी गेल्यावर बसा तुम्ही ग्यानबा-तुकाराम करत..", "ये गं माझी बाय लाडाची ती" असले वेगळे वेगळे संवाद आजोबांच्या तोंडातून येत आणि असा वाटायचं की सगळ्या गाई ते सगळं ऐकतात सुध्दा.

मध्यंतरी मला एक-दीड वर्ष गावी जाऊन राहावे लागले. येऊन-जाऊन करत होतो पुण्याला पण जास्त मुक्काम गावातच. गाव पुरंदर तालुक्यातल, पुणे जिल्ह्याचचं. गावात बागायती आणि जिरायती अश्या दोन्ही प्रकारची शेती होती. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुध्दा तेवढीच मोठी तफावत होती. श्रीमंत शेतकरी प्रत्येक वर्षी जास्त श्रीमंत आणि गरीब शेतकरी दरवर्षी महागाईमुळे जास्त गरीब. ब-याच गरीब शेतकरी बायका रोजावर (रोजंदारी) गावातल्या शेतक-यांच्या शेतात कामाला जायच्या. पंचवीस रुपये रोज होता तेव्हां त्यांना. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अश्या वेळेत त्यांची कामे चालायची. पहाटे उठून, स्वयंपाक करून, स्वत:च्या शेतातील काम उरकून ९ वाजता 
दुस-याच्या शेतात कामाला रुजू.

आमच्या शेजारी एका पडक्या घरात असेच एक कुटुंब होतं. नाकर्त्या पुरुषांची पुरुषप्रधान संस्कृती सकाळपासून हातभट्टीच्या गुत्त्यावर रिघ लावून बसायची; त्या गर्दीतच त्या काकूंचा नवरा असायचा. काकूंना दोन मुलं. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी मोठी होती आणि मागच्याच वर्षी तीचं लग्न झाले हो्ते आणि मुलगा तालुक्याच्या गावाला बारावीला जात होत."छोट्या" म्हणायचे सगळे त्याला. पोरगं तसं चुणचुणीत, गोरंपान, अगदी लहान शरीरयष्टी, मला तर पहिल्यांदा तो आठवी-नववीचा विद्यार्थी वाटला. मी त्याला माझी सायकल दिली होती पुण्यातून आणून. कारण घरात माझी बढती बाईकवर झाली होती. सायकल चालवतच तो जवळच्या एका गावात आणि तिथून एसटीने तालुक्याला जायचा. त्याच्या गावातून सात किलोमीटरपर्यंत तो सायकल चालवत जायचा. एका बाजूने पूर्ण चढ आणि एका बाजूने उतार. एवढासा जीव कशी काय सायकल तिथपर्यंत चालवत असेल याचं मला नेहमी कौतुक वाटायचं. ह्या दिड वर्षात मी त्याच्या अंगावर कॉलेजात जाताना एकच शर्ट बघितला आणि एकच प्यांट. पायात पांढरी-निळी स्लीपर, केसांचा कोंबडा करायची हौस होती त्याला. एकटा घरी असला की आरश्यासमोर उड्या मारून आपले केस हवेत उडतात का ते पहायचा आणि सारखा कंगवा हातात ठेवायचा. दिड वर्ष एकच ड्रेस कॉलेजसाठी? खरंतर अश्या विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्मच बरा. असो...

त्याची आई बिचारी जबरदस्त कष्टाळू बाई. दिवसभर कष्ट ते सुद्धा अक्षरशः गुरासारखे. तिचा दिवस मात्र खूप जास्त भयानक अवस्थेमध्ये संपायचा. रात्री नवरा दारू पिऊन यायचा आणि मग छोट्याची आणि त्याच्या आईची बराच वेळ रडा-रडी सुरु व्हायची, नवरा शिव्या देत राहायचा आणि दारूच्या नशेत मारहाण सुध्दा करायचा. ठराविक वेळेत हा गोंधळ नाही थांबला की शेजारच्या म्हाता-या बायका यायच्या, मध्यस्थी करायच्या आणि सगळा गोंधळ थांबवायच्या. बाहेर येताना एखादी 
म्हातारीतरी म्हणायचीच "काय पोरीने पाप केलया म्हणून तिच्या नशिबी असला राक्षस नवरा दिलाय देवानं" असाच एका रात्री खूप गोंधळ चालू होता. नवरा बेदम मारहाण करत होता तिला. मला वाटल मी जाऊन मध्यस्थी केली पाहिजे. छोट्या मोठमोठ्याने ओरडत होता. काळजाचा अगदी थरकाप उडाला. हातातील पुस्तक खाली ठेवले आणि चप्पल घालून तडक त्यांच्या घराकडे निघालो; लगेच वाटेत शेजारी राहणारा चंदू शेठ आडवा आला; त्याने मला त्या घरात जाऊ दिलं नाही. "जाऊ नका तिथे नाहीतर अजून गोंधळ होईल" असे सांगितले. चंदूशेठच स्वत:चं सरकारी स्वस्त धान्य दुकान होतं. त्याने मला सांगितलं "मी बी असाच एकदा तडा-तडा घरात गेलो आणि छोट्याच्या बापाला घरातून बाहेर आणला. मला वाटला झाल आता समदं बैजवार (व्यवस्थित). पण कशाचं काय राव, मी तिथून जाताच त्या बाबाने जे काय त्या बाईला झोडली की ईचारू नका. तो म्हणायचा तुझं आणि त्या चंद्याशेठच काहीतरी लफडं हाये. म्हणूनच घरात घुसला माझ्या. बाऽ बाऽ बाऽऽ तव्हापासून कानाला खडा…आपल्या समजुतीमुळे त्या माउलीचा जीव जायचा. जावा,पडा निवांत घरात.तुम्ही तर पाव्हण्यासारखं आहात गावात..कशाला बरामत घेता अंगावर".
मी हे ऐकून अक्षरश: गोठूनच गेलो. आणि मला हे सुद्धा कळालं फक्त बायकाच का जातात ह्यांच्या घरात हा गोंधळ मिटवायला. रोज जवळ-जवळ असाच शेवट व्हायचा दिवसाचा. पहाटे ४ वाजता छोट्याची आई अंघोळ करून औदुंबराच्या (उंबर) झाडाला पाणी घालताना दिसायची ते ही अगदी वेगात. तिची सगळीच काम खूप वेगामध्ये तशीच तिची भक्तीसुद्धा. तासाच्या आत छोट्याचा डब्बा आणि नव-याची दिवसभर गिळायची व्यवस्था करून डोक्यावर घमेलं, खुरपं, विळा कधी कधी हातात फावडे, कुदळ घेऊन बाई तरा-तरा साडी आवरत स्वता:च्या मळ्यात निघायची. जाताना बाहेरूनच छोट्याला आवाज द्यायची. "बाळाऽऽऽ उठ लवकर. आज उशीर केला ना कालेजला तर कंबरेत लाथ घालील बघ". अजून एक वाक्य यायचं ते म्हणजे "हरणीला बाहेर उन्हाला बांध थोड्या येळान".

"हरणी" हा काय प्रकार आहे हे मला पहिल्या दिवशी कळालंच नाही. त्यांच्या दारात काही गोठा सुध्दा नव्हता की एखादी गाय आहे आणि तीच नाव हरणी असेल. पण ७:३०च्या आसपास छोट्या एक शेळी घेऊन घरातून बाहेर पडायचा आणि त्या शेळीला उन्हामध्ये बांधायचा. लवकर कॉलेजला जायचं असेल तर छोट्या त्या शेळीला "बाय बाय हरणी …!" म्हणायचा आणि स्टाईलमध्ये फ्लायिंग किस सोडायचा. तेव्हां मला कळाले की त्यांनी पाळलेल्या शेळीचे नाव ’हरणी’ आहे. काळ्या रंगाची हरणी आणि तीचे तोंड मात्र संपूर्ण पांढरशुभ्र. जास्त केसही तिच्या अंगावर नसायचे. बरच वयं होत बहुतेक हरणीचे. अगदी तुळतुळीत शेळी मी पहिल्यांदा पहिली आणि ती ही अगदी स्वच्छ. संध्याकाळी कुत्र्या आणि लांडग्यांच्या भीतीने छोट्याची आई हरणीला घरात बांधायची. हरणीचे दूधच ते घरात चहासाठी वापरत. हरणी वर्षातून एकदा यायची म्हणजे तिला पिल्ले व्हायची. विशेष म्हणजे तिला नेहमी तीन पिल्लं व्हायची. शेळीच्या पिल्लाला करढू म्हणतात. नर करढू असेल तर बोकड आणि मादी करढू असेल तर पाठ. अशी ह्यांची नावाने विभागणी होत असते. हरणीला नेहमी तीन करढे होयची. तीन करढे नेहमी व्हायची म्हणून हरणी त्या परिसरात प्रसिध्द होती.

काही दिवसांनंतर हरणीला तीन करढे झाली. २ पाठी आणि एक बोकड. काय झाले कोणास ठाऊक पण २० दिवसात दोन्ही पाठी मेल्या आणि राहिला जिवंत तो फक्त बोकड. हरणीमधे काही तरी जबरदस्त बदल आला. ती तिच्या पिल्लाला म्हणजे बोकडाला अजिबात जवळ करत नसे आणि त्याला दूध सुध्दा पिऊ देत नसे त्यामुळे बोकड उपाशी राहायचं आणि सकाळी लहान बोकड ओरडत बसायचं. महिन्याचं होऊन गेला तरी बोकड ७ दिवसाच्या पिल्लासारखं दिसायचं. छोट्याची आई लहान मुलाच्या दूधाच्या बाटलीमधे दूध काढून घेत असे आणि त्या बाटलीने छोट्या रोज सकाळी घराच्या बाहेर त्या पिल्लाला दूध पाजत असे. ते पिल्लू सुध्दा आईला ढूसण्या मारून दूध प्यावं तस बाटलीमधून दूध पीत असे. छोट्याच्या आईने त्या बोकडाचे नाव "रामा" असे ठेवलं. मग काय; तिथून पुढे सकाळी-सकाळी जोपर्यंत छोट्या उठत नाही तोपर्यंत रामा कायम काकूंच्या मागे-मागे फिरायचा. काकू सुध्दा त्याच्या बरोबर बोलायच्या रामा ब्यांऽऽऽ ब्यांऽऽऽ करत त्याच्यांशी गप्पा मारायच्या. छोट्या उठला की लगेच त्याचा एका जुना शर्ट रामाला गुंडाळायाचा. मग सगळीकडे रामा आणि छोट्याची जोडी इकडे-तिकडे उड्या मारत फिरायची. रोज थोडी गव्हाची कणिक छोट्याची आई ठेवायची, त्याच्या गोळ्या करून छोट्या रामाला खायला घालायचा. शेतावर काकू कामाला जाताना हरणीला हातात आणि रामाला टोपलीत ठेऊन ती टोपली डोक्यावर घेऊन शेतावर जायच्या. छोट्या कॉलेजवरून येता येताच जिथे कुठे त्याची आई कामाला आहे तिथे जायचा आणि रामाबरोबर खेळतखेळत घरी यायचा. रामा मोठा होत होता पण थोडा अशक्तच; त्यामुळे त्याला बोकडाचा वान नव्हता. रंगाने तांबडा अगदी तुळतुळीत. बारीकसं तोंड आणि जागेवर कायम उड्या मारत राहणे, छोट्या कुठूनही नजरेत दिसला की लगेच ओरडायला सुरवात आणि त्याच्याकडे पळत जायचा, छोट्याही त्याच्याकडे बघत बघत रामा सारखाच उड्या मारत त्याच्यापर्यंत यायचा. रामा हरणाच्या पिल्लासारखा दिसायचा.शेजा-यापाजा-यांमधे रामा बोकड आणि छोट्याची मैत्री चर्चेत होती. रात्री झोपताना सुध्दा छोट्या त्याला स्वत:च्या गोधडीमधे धरून ठेवायचा. छोट्याला कधी त्याच्या मुताची घाण आली नाही की त्याच्या लेंड्यांची किळस वाटली नाही. जिथे-जिथे छोट्या जाईल तिथे त्याच्या मागे-मागे रामा असणारच. नंतर काही दिवसातच छोट्याने रामाला बुक्का लावायला सुरवात केली त्याच्या गळ्यात गंडे घालायचा. स्वत:च्या अंग्ठ्यामध्ये काळा दोरा घेऊन रामासाठी जाड असा गोफ बनवला होता. घुंगरू होते. माझ्या आयुष्यात मी कधी बोकड किंवा शेळ्यांचे कधी परिक्षण केले नाही कारण कधी त्यांच्यात विशेष असे काही वाटले नाही. पण रामाची बात काही औरच होती आणि त्याच्या जोडीदाराची सुध्दा. शेजारी-पाजारी सुध्दा रामाकडे पाहून अगदी नेहमीप्रमाणे बोलायचे "कसं वेगळंच करढू आहे" सगळे म्हणायचे."वान कसा हरणासारखा आहे आणि नेमका त्याच्या आईचे नाव सुध्दा हरणी आहे. हाय का नाय योगायोग". छोट्या त्याची साफ-सफाई करायचा खूप स्वच्छ आणि खूप चकचकित असायचा रामा.

एक दिवस हरणीने व्यवस्थित दूध दिले नाही म्हणून छोट्याने जास्त प्रमाणात कणिक खायला घातली. रात्रीपासून रामा थोडा नरमला होता. जास्त उड्या मारत नव्हता, नंतर त्याला जुलाब चालू झाले होते (तिथल्या ग्रामीण भाषेत ढंढाळी लागणे). पार अर्धजीव झाला होता रामा. छोट्याचा जीव सकाळ होईपर्यंत कासावीस झाला. रात्रभर छोट्या काही झोपायला तयार नाही. त्याच्या आईने सांगितले "सकाळी डेअरीवर जाऊन डॉक्टर घेऊन येऊ,आता झोप.काही नाही होत. ढंढाळी लागत असते शेळ्या-करढाना". गावातले शेतकरी सकाळी गावातल्या चावढीपाशी दूध घेऊन यायचे. तिथे सगळं दूध जिल्हा दूध संघामार्फत गोळा केले जायचे. मोठी उलाढाल होती ह्या धंद्याची. तिथे बरेचशे शेतकरी चांगल्या शेतक-यांना सल्ले विचारात असे,"काय पेरलं पाहिजे","कोणत औषध मारलं पाहिजे","बाजरीचा कोणत वान घेतला पाहिजे", असे बरेच काही. मी सुध्दा रोज सकाळी पेपर आणायला जायचो. तिथेच आजूबाजूच्या गावाचे व्हेटरनरी (veterinary) डॉक्टर्स बसलेले असतात. ज्यांच्या गुरा-ढोरांना, प्राण्यांना काही प्रोब्लेम असेल तर शेतकरी त्या डॉक्टर्सना आपला पत्ता देतात आणि मग डेअरीची वेळ संपल्यावर ते डॉक्टर्स सर्व जमलेल्या पत्त्यांवर जातात. 
छोट्या एका डॉक्टरकडे गेला आणि त्याला सांगितलं "आमच्या बोकडाला ढंढाळी लागली आहे, तुम्ही त्याला बघा". 
डॉक्टर उलट त्यालाच म्हणाले" अरे बोकाडच ते.;काही खाल्ल असल होईले ठीक". 
बोकडासारख्या छोट्या प्राण्याकडे डॉक्टरला पाहायला वेळ नव्हता. दुस-या डॉक्टरकडे जाऊन छोट्या अगदी रडव्या स्वरात सांगत होता "चलाना आमच्या घरी". 
त्या डॉक्टरने सुध्दा त्याला झिडकारलं होतं. मग छोट्याच्या शेजारच्या एका माणसाने डॉक्टरला सांगितलं "आहो माझ्या गाईला बघायला येताय तर मग तुम्ही तवा घ्याकी बोकडालाबी बघून. लई जीव हाय पोराचा त्याच्यावर आणि बोकाड सुध्दा अस हाय ना.! की बास. असलं जीतराफ (शेतक-याचे पाळीव प्राणी)  तुम्ही सुध्दा कधी बघितला नसल". 
डॉक्टरने छोट्याला सांगितलं "टाकतो चक्कर.तु हो पुढे. मी येतो तासभरात".
तो डॉक्टर छोट्याच्या घरी आला, तेव्हा छोट्या चुलीसमोर रामाला मांडीवर घेऊन बसला होता. डॉक्टरने बोकडाला पहिला आणि एक भली मोठी गोळी त्याच्या तोंडात घातली अन म्हणाले "होईल बरा संध्याकाळपर्यंत". 
छोट्याने लगेच बोलायाला सुरवात केली,"एवढी मोठी गोळी कशाला घातली तोंडात त्याच्या. तुकडे करून पिठातून दिली असती मी त्याला.आधीच त्याच्या पोटात गडबड आहे, त्यात एवढी मोठी गोळी".
डॉक्टर म्हणाले, "कणिक ह्याच्या तब्बेतीला चांगली; पण जास्त घालू नका खायला, पचवायला जड जातंय त्याला ".
"लगेच बरा होईलना आता तो, सकाळ पासून आवाजसुध्दा नाही काढला बाहेर त्याने, खेळतपण नाही". छोट्या रडवेला झाला होता.
डॉक्टरला सुध्दा हे प्रकरण थोडं वेगळं वाटले. 
डॉक्टर- "वयाच्या मानाने तुमचा बोकड बराच लहान आहे. ठेवण्यापेक्षा देऊन टाका खाटकाला; असाही आखाड चालू झाला आहे". 
छोट्या लगेच ताडकन उठला आणि रामाला जाऊन पकडलं "आम्ही नाही विकणार रामाला खाटकाला. आईगं आपण नाहीना विकणार रामाला?".
छोट्याचे वडिल-"त्याला ठेऊन काय गावावर सोडायचा का उडवायला". 
छोट्याला काही अर्थ कळला नाही त्याचा "मी नाही विकू देणार त्याला" 
अस म्हणत त्याने रामाला उचलला… रामाने सुध्दा त्याच्या छातीवर मान टाकली. ती सुध्दा अगदी प्रेमाने. छोट्या रडायला लागला होता..
छोट्याची आई-"किती झाले डॉक्टर साहेब तुमचे? आमच्या पोराला लागलय त्या बोकडाच याड".
 डॉक्टर-"माझे काहीनाही झाले. नको मला पैसे. पहिल्यांदाच बघतोय बोकाडावरच प्रेम. कुत्र्या मांजरावर सुध्दा एवढ आजकाल कोण जीव टाकत नाय. तुमच्या रामा आणि छोट्यासाठी माझ्याकडून पैसे माफ" असे म्हणून डॉक्टरने आपल्या एम८० ला  किक मारली आणि निघून गेले.

रामा आता परत उड्या मारायला लागला. छोट्या सकाळी त्याच्या बरोबरच कसला तरी पाठांतर करत होता. बहुतेक परीक्षा होती त्याची कसलीतरी. दारासमोर वही घेऊन येरझ-या घालत छोट्या वाचायचा आणि रामा त्याच्या मागे-मागे येरझ-या घालायचा. छोट्याच्या घरात ब-यापैकी अंधार असायचा आणि रात्र झाल्याशिवाय दिवा लावायचा नाही, हा त्याच्या आईचा नियम होता. घरात फक्त एक बल्ब आणि एक जुना टेबलफॅन तो सुध्दा छोट्याच्या वडिलांसाठी. तरीसुध्दा विजेचा वापर बिलाचा विचार करून कमीच. त्यामुळे छोट्या दारासमोरच अभ्यास करायचा आणि त्याच्या मागे-मागे रामा, जवळच्या रस्त्याने जाणा-या एका मुलांच्या घोळक्याने छोट्याला आवाज दिला आणि रामाला त्याच्या बरोबर पाहून सगळे म्हणायला लागले."छोट्या माकड आणि रामा बोकड","छोट्या माकड आणि रामा बोकड","हय..छोट्या माकड आणि रामा बोकड". छोट्या त्यांना सगळ्यांना जोरात "हाड हाड" म्हणाला आणि आपल लक्ष परत रामावर आणि अभ्यासात घातलं.

एक दिवस सकाळी-सकाळी एक भला मोठा काळाकुट्ट माणूस छोट्याच्या घरी आला होता. छोट्याच्या वडिलांनी त्याला बोलावलं होते. पायजमा, लाल भडक रंगाचा शर्ट, हाताच्या बोटांमध्ये जाड-जाड अंगठ्या. राजदूत गाडीवर फट-फट करत आमच्या घरासमोर गाडी लावली. माझ्याकडे बघत तोंडातली तंबाखू आमच्याच घराच्या भिंतीवर टाकली. दिसायला अगदी फिल्मी खलनायकासारखाच. त्याचा एक डोळा सुध्दा बारीक होता. बहुतेक तो कामातून गेलेला असावा. लांब पण पातळ केस, मागे सरकवलेले आणि पायात त्याच्या वजनाला शोभतील अश्या वजनी वहाणा. जोरात छोट्याच्या वडिलांना आवाज दिला. वडिल बाहेर आले. छोट्याची आई आली. छोट्या आपल्या फाटक्या बनियन आणि जुन्या शाळेच्या खाकी चडडीवर बाहेर आला. छोट्याच्या वडिलांनी नमस्कार केला आणि छोट्याच्या आईला सांगितलं की आलेली व्यक्ती ही खूप मोठा खाटिक आहे. नाव त्याच संपतराव होतं. छोट्याच्या आईला आपल्या नव-याने खाटकाला घरी कशाला बोलावलं ते लगेच कळालं. रामाला विकायचा बेत होता. तिने तिथेच सुरवात केली, "हे बघा जे काही पैसे येतील ते मला पाहिजेत. मला झेंडूची रोप आणायची हायेत शेतात लावायला".
छोट्याचे वडिल "हा हा मला माहिती हाये. त्यासाठीच बोलावलं हाये मी ह्यांना."
खाटिक- "कुठाय बोकाड, बघू जरा". 
छोट्याला हा काय प्रकार चालला होता ते कळत नव्हतं. तो हरणीला पिठाचा चाळ खायला घालत होता. त्याच्या मागेच रामा होता. छोट्याच्या आईने पटकन येऊन रामाला उचल आणि खाटकासमोर ठेवला. लगेच छोट्या खाटकापर्यंत गेला. खाटिक खाली वाकला आणि रामाच्या मानेच्या थोडे मागे आणि पाठीच्या थोडासा पुढे एक हाताने जोरात दाबलं. रामाने मोठा भयंकर आवाज काढला. रामा तडफड करायला लागला. छोट्याला काय ते पाहवलं नाही "ओऽऽऽऽऽ.. सोडा त्यालाऽऽऽऽ".
त्या खाटकाला रामा सारखीच छोट्याने ढुसनी दिली आणि रामाची सुटका केली.रामा जोरात पळत-पळत हरणीच्या तिथे गेला. त्याचा भयानक आवाज ऐकून हरणी ओरडायला लागली होती. खाटकाला छोट्याचा राग आला. पडला असता तो जोरात. पण सावरला 
संपतराव- "मांद नाय हो बोकडात तुमच्या. किती द्यायचे तुम्ही सांगा. ४-५ महिन्याचा म्हणताय तुम्ही पण बोकडात काय दम नाय. अजिबातच मांद नाय. भरलंच नाय ते" (मांद म्हणजे एकंदरीत प्राण्याच्या अंगात असणारे मांस)
छोट्या- "नसुद्या मांद, आम्हाला नाय विकायचा रामाला"
छोट्याचे वडिल- "थोबाड फोडू का तुझं. लै तोंड चालवतोय"
छोट्या जोरजोरात रडू लागला "आई नकोना गं विकू रामाला. हरणी परत याली की ती करढ विक वाटल्यास. रामाला नकोना विकू"
छोट्याच्या आईला छोट्याच्या रडणं आणि अवस्था बिकट वाटली आणि तिला सुध्दा खूप वाईट वाटलं. तोंड पदराने झाकलं आणि हुंदका देताच म्हणाली "तुझ्या बापालाच सांग काय ते. मला तर काय कळाना आता".
एवढेच म्हणून ती घरात गेली. छोट्याच रडणं चालूच होतं. छोट्याच्या वडिलांनी संपतरावशी बोलायला सुरवात केली.
"संपतराव नका लक्ष देऊ त्या  ****कडे. बावळट हाये ****चा. तुम्ही जावा घेऊन बोकाड. सांगा किती होत्यात ते"
खाटिक- "नको मला तुमचं बोकाड. आसं हे जीव असल्याल जीतराफ आम्ही विकत घेत नाय. पोराचा जीव हाये तुमच्या बोकडावर. नको. जीव गुतल्यालं जीतराफ नको मला. लाभत नाय असलं आम्हाला". असं म्हणून त्याने आपली राजदूत चालू केली आणि निघून गेला. छोट्याच्या वडिलांना छोट्याचा फार राग आला होता. 
"घरात चल. साल्टच (चामडी) काढतो तुझं" असे म्हणत, तन-तन करत घरात निघून गेला. छोट्याने मात्र आपला रडणं थांबवलं आणि अगदी खुशीत रामाला जवळ घेऊन बोलायला लागला "नाय विकणार तुला कुणीच. आता नाय विकणार तुला कुणीच" रामा सुध्दा त्याच्या बरोबर उड्या मारायला लागला. हे दृश्य पाहून मला सुध्दा खूपच आनंद झाला. रामा आणि छोट्या खरच खूप खुष होते आणि मला ते माझ्या डोळ्याने दिसत होत. खरंच, सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्या भावना असतात. आपण फक्त त्या बघत नाही किंवा ओळखत नाही. छोट्याला येवढा खुश पाहुन रामा सु्ध्दा डोळे विस्फारून छोट्याकडे बघत आनंदाने जागेवरच उड्या मारत होता. प्राणी कोणताही असुदेत त्याच्या भावना समजून घेणं, त्या ओळखणं आणि त्या स्वत: अनुभवनं म्हणजे जबरदस्त अनुभव असतो आणि त्याची मला अनुभूत्ती सुध्दा आली होती.

२-३ महिने झाले होते. छोट्याला परीक्षेमुळे तालुक्याच्या गावात होस्टेलवरच राहायचं होतं. ३-४ महिने छोट्या शनिवारचा घरी यायचा. रामा मोठा झाला होता. पण तो बोकडाचा वान काय अजून आला नव्हता. आता मात्र छोट्याच्या आईने चंगच बांधला होता. रामाला विकायाचाच. छोट्याला एक दिवस बाहेर बसून सांगत होती.
"आता येत्या शनवारी रामाला विकणार हाये".
छोट्याने खूप आरडाओरडा सुरु केला.
"अरे आपली हरणी परत घाबण हाये. होत्यालाच की तिला करढं".
छोट्या-"मग ती करढं विकून टाक".
छोट्याची आई- "आता पैसे लागायचे हाइत घरात. तुझ्या हट्टापायी झेंडू सुध्दा लावता आला नाही. आता गरज हाय पैश्याची. तुझे काय दात पाडून आणायचे का पैसे". छोट्याची आई आता वैतागाच्या स्वरात बोलत होती. 
छोट्या रागाने," नाय विकायचा रामाला." 
दन-दन पाय आपटत छोट्या रामाकडे निघाला. सोमवारी छोट्या आईला सारखासारखा सांगत होता 
"आई रामाला विकू नको बर का".
 आई नाही नाही म्हणत त्याला एसटी स्टँडवर छोट्याला सोडून आली. घराकडे येता-येता मुसलमानाच्या घरात खाटकाला उद्या सकाळीच घरी पाठवायचा निरोप देऊन आली.

दुस-या दिवशी शेजारची जनाकाकू आणि छोट्याची आई खाटकाची वाट बघत बसल्या होत्या. जनाकाकू नावाची आज्जी म्हणजे छोट्याच्या आईचा मोठा मानसिक आधार. छोट्याची आईने रामाचा दोर हातात धरला होता आणि दोन पायावर बसली होती. डोळ्यात चांगलच पाणी तरारलं होतं. जनाकाकू तिच्याशी बोलत होती.
"आग पोरी, शेतकऱ्याच्या आयुष्यात जीतराफच असत्यात. असा शेळा-करढावर जीव लावला तर कस जगता येईल. बोकाड मोठ झालय आता. उडाया बघतय सगळीकड. यवढच वाटतंय तर थांब अजून थोड दिस. तुझी हरणी हायेच घाबण, तिला होतील करढ. मग हे बोकाड इकून टाक." 
छोट्याची आई "तस नाय वो जनाकाकू. मागच्या आठवड्यात पोरीचा फोन आला व्हता शेजारी. ती सुध्दा गरवार (pregnant) हाये. सातवा महिना संपलाय आता. आता पाव्हनं म्हणत्यात की बाळंतपणाला माहेरी जा म्हणून. आता पोरीचा बाळंतपण जरी सरकारी दवाखान्यात केलं तरी खर्च येणारच की वो. कुठून आणू पैसा".
तिच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहत होते."मी काय आज करते होय शेळ्या करढाचं पण ह्या पोरामूळं बोकडात जीव अडकला माझा पण. त्याला जर कळालं तर पोरगा अभ्यास पण नाय करायच. रडून-रडून नको करल. लै तरास करून घेता स्वत:ला बोकडासाठी".
जनाकाकू- "कोनाला कशाची माया लागल सांगता येत नाही पोरी. चांगला जीव लावला बोकडाला. तुझ्या पोरीच्या पोराबाळासाठीच कामाला आला शेवटी. ह्यच बघ कसा देव पण करतो. तुझ्या पोरीच्या बाळंतपणासाठी तुझ्या हरनीच बाळंतपण कामाला आलं. आई अंबाबाई सगळ बघतीया पोरी. उग रडू नगस. काढू आपण छोट्याची समजूत".
छोट्याची आईने रामाचा दोर जनाकाकूंकडे दिला आणि म्हणाली, "देऊन टाका खाटकाला. मी जाते मागच्या रानात. मला नाय बघवायाचं रामाला आता" .
डोळे पुसत पुसत छोट्याची आई रामा कडे गेली, बारक्या पोराला गोंजाराव तसा रामाला गोंजारलं, त्याला पाणी दिलं. हातातला कणकेचा गोळा दिला आणि तरातरा हरणीला घेऊन निघून गेली.
राम तिच्या कडे बघून ओरडत होता. आज त्याला रानामध्ये चालवलं नव्हतं. जनाकाकूच्या मागून हे दृश्य मी पहात होतो. जनाकाकूचे डोळे सुध्दा पाण्याने भरून आले.
औदुंबराच्या झाडाकडे बघत जनाकाकू म्हणाली, "देवा कसा रं जीव अडकवला तू. तुझी पाटी तुलाच माहिती. लक्ष ठेवरे बाबा".

काही दिवसांनी माझ्या घरी फोन आला. छोट्याच बोलत होता. त्याच्या आईला मी बोलावून घेतलं. छोट्या आईला मोठ्याने विचारात होता, "आईऽऽऽ..हरणी ला काय झालं...? आणि ताईला मुलगा झाला की मुलगी?"

6 comments:

  1. मला आधी वाटल होत कि टिंग्या ची थोडीशी छाप आहे या कथेवर पण जस जस पुढे वाचत गेलो
    तस तस मला यातला नाविण्यापणा जाणवायला लागला
    आणि यातला शेवट वाचणार्यांना च्या साठी केला नाही त्या बद्दल कौतुकास पत्र आहेस


    फकीरा

    ReplyDelete
  2. खुपच छान!!
    रियल इव्हेनटसला कथेचा 'टच' मस्त जमलाय... इम्प्रेस्स्ड!!!!
    असंच लिहित रहा.

    ReplyDelete
  3. लिहीले ऐसे की लेखक व्यक्त झाला...
    वाचोनी ऐसे वाचक तृप्त झाला....!!

    ReplyDelete
  4. प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद मित्र हो..

    गजा भाऊ "फकीरा" नाव आवडल

    ReplyDelete
  5. good one...
    worth reading
    gramin bhashevar changali pakad ahe tujhi!!

    ReplyDelete