उतरणीवरुन सुर्य गेल्यानंतर रात्रीने सगळ्यांच्या जगाचा ताबा घेतला पण उद्या होणारी सकाळ नक्की काय घेउन येईल ह्याचा मागमूस कोणालाही नव्हता.
झोपेच्या अंधा-या कुशीमधे तर स्वप्नांना सुध्दा बंदी होती. निर्जीव यंत्राप्रमाणे दिवसभर हात-पाय चालत होते, रक्ताचा रंग बदलत होता आणि पाण्याप्रमाणे शरीरातून निघत होता. शरीरातील एकएक तंतु गुप्त होउन काही घटकांच्या मरणयात्रेवर गेला होता. जो जीवन जगतो त्याला स्वप्न, इथे तर धड जगणं सुध्दा नव्हते. आयुष्य नावाच्या एका भेसुर आणि दुर्दैवी जन्माच्या यात्रेचा गाडा ओढायाचं काम सगळेच करत होते. दिवस येतो तो फक्त कष्टासाठी आणि मावळतो तो फक्त मरण्यासाठी. त्या अस्वस्थेतच एक जीव किनकिनत होता. निद्रा नामक तात्पुरत्या मृत्यूशय्येवर सगळे जीव निर्जीव झाले होते. मात्र त्या जीवावर लक्ष होते ते फक्त अंधाराचं. तो चाचपडत उठला आणि जोराने टाहो केला, "आयेऽऽऽऽऽ... लै पोटात दुखतयं.."
त्या सपराच्या घरातून बराच वेळ ओरडण्याचा आवाज येत होता. तो आवाज सुध्दा त्या दिर्घ रात्रीच्या अंधाराने गिळून टाकला. असं झालं तरी काय. कुणाला काहीच माहीत नव्हतं. अंधाराचा गडदपणा हळूहळू कमी होत गेला, तसं चित्र स्प्ष्ट दिसू लागलं. सपरांच्या घराची मोठी चाळच होती. रानात काम करणा-या गड्यांच्या संसाराची वस्ती.
ज्वारीच्या वाळक्या कडब्याच्या आणि ऊसाच्या पाचोळ्याचे झाप बनवून भिंती तयार केलेल्या. अश्या झोपड्यांची मोठी चाळच इंदलकरानी बांधली होती. "खोपाट " म्हणायचे सगळे ह्या झोपडी सारख्या घराला. इंदलकराच्या मळ्यात हे सगळे सालाने काम करणारे आणि त्यांच्या बायका त्याच मळ्यात रोजंदारी करणा-या. सा-या वस्तीला जाग आली होती पण परश्याच खोपाट ऊघडलं नव्हतं. गंजलेल्या पत्र्याचा टेकु लावला होता. तो पत्रा म्हणजेच त्या खोपटाचा दरवाजा. बायका विहीरीवरुन हंड्याने पाणी भरत होत्या. कोणीतरी परश्याच्या दारात ठेचकळली तेंव्हा तिच्या नजरेत खोपटाच बंद दरवाजा आला. तिथेच लागलेल्या ठेसेचा राग त्या बंद घरावर काढला आणि बरोबरच्या बाईला म्हणाली, "यस्वा मेली. इंदलकराच्या मुकादमाबरोबर पाठ लावती आणि नवरा खातुया भाड."
दण्-दण पाय आपटत त्या दोघी दारातून निघून गेल्या.
त्या वस्तीतल्या नानाच्या ही गोष्ट लक्षात आली. नाना वस्तीवरचा वयस्कर माणूस. एकटाच रहायचा. त्याने खोपटाच्या दारातून परश्याला आवाज द्यायला सुरवात केली,
" परश्या.. ओ राज.. तुम्ही तर लका आक्रितच करतया गड्या हो. समदी निघाली तरी तुमचा उठायचा पत्ता नाय. दोघं नवरा-बायकु काय खोपडी पिऊन झोपली का काय". नानाने दारात वाट बघितली. तंबाखू काढली आणि तिथचं मळत उभा राहिला. आतून काहीच हालचाल नाय म्हणल्यावर चुण्याच्या डबीने दार वाजवायला सुरवात केली. आतमधुन कसलाच आवाज येत नव्हता. नाना थोडा तणतणला. दोन-चार गडी त्या खोपटाच्या दारात बोलावले. त्यातला एकजण बोलायला लागला,
"आरं काय वो हे? परश्या दारुसाठी मुकादमाची पाठ सोडत नाय अन त्याच्या बायकुची मुकादम पाठ सोडत नाय. आजुन ह्यांच्या आयला ऊठायचा तपास नाय. ऊस काढायचाय आज अन हा भाड्या झोपुन राह्यलाय".
त्यांच्यातलाच उत्तम नावाचा सालदार,"आवं ती बाई मुकादमाला करल मुका आणि परश्याला करल मुकादम आपल्या ऊरावर बसवायला. ह्याच्या आयला काढा बाहीर त्याला. गडी यायचा उशीरा तवर आपुण उरकायच्या काय त्याच्या सरी".
सगळेजण दार वाजवत होते. शेवटी खोपटाच्या दाराला जोराचा धक्का दिला. खोपटाचे दार उघडले. खोपटाच्या आतुन एखादी वीज वेगाने दारावर येऊन सर्वांच्या अंगावर धडकावी आणि त्याच वेगात सगळेजण हादरुन दरवाज्यापासून उलट्या पायाने आणि विजेच्या वेगाने मागे फिरले. एखादी कोणाला न ऐकु आलेली किंकाळी सगळ्यांचे कान सुन्न करुन गेली आणि सगळ्यांच्या नजरा सुध्दा बधीर झाल्या. परश्याच्या खोपटामधे एक बारीक हालचाल झाली; आणि मागे फिरलेले पाय पुन्हा खोपटाकडे त्या निर्जीव वातावरणात चालू लागले. जी बारीक हालचाल झाली ती अर्जुनाची. ’अर्जुन’ परश्याच्या एकमेव मुलगा. परश्या आणि त्याची बायको खोपटामधे हात-पाय वाकडे करुन पडले होते. बाभळीच्या लाकडासारखे कडक झालेले हातपाय आणि अस्ताव्यस्त झालेली त्यांच्या अंगावरची फाटकी वस्त्रे वस्तुस्थितीची जाणीव करुन देत होती. दोघांचाही जीव मरणयात्रेवर गेला होता. दोघांचाही मृत्यू झाला होता.
अर्जुन त्यांच्या बाजुलाच त्या ताडपत्रीवर पडला होता. एक पाय हवेत उचलायचा प्रयत्न करत होता. पोट दाबत होता. तोंडातून फेस वजा थुंकी बाहेर काढत होता. अर्जुनाला जिवंत पाहून सगळ्यांनी लगबग केली आणि खोपटात घुसले. वस्तीतल्या नानाने पटकन खाली बसून अर्जुनाचा पाय उचलून त्याचा तळवा चोळायला सुरवात केली. त्याच वेळी खोपटाच्या कोप-यातुन सळ-सळ असा दिर्घ आवाज झाला. त्या आवाजाकडे सगळ्यांच लक्ष वेधले गेले. नानाने अर्जुनाचा पाय हातून तसाच सोडून दिला आणि तो तसाच उभा राहिला. दोन काळेकुट्ट साप खोपटाच्या पाचोळ्यातून बाहेर जात होते. एक अंदाजे तीन्-चार फुटाचा असेल आणि एक त्याच जातीचा साधारण दिड फुटाचा होता. आवाजाची सळ-सळ ज्या वेगात आली त्याच वेगाने दोन्ही साप पाचोळ्यातून बाहेर गेले. ती सळ-सळ आणि सापांनी वेगात जाण्यासाठी सरपटताना केलेली वळ-वळ सगळ्यांच्याच अंगावर काटा आणून गेली. भितीने सगळ्यांचे घशे कोरडे पडले, घश्यातच आवंढे घेत सगळेजण उभे राहिले आणि पटकन अर्जुनाला उचलून खोपटाच्या बाहेर आणले.
पटकन कुणीतरी जाऊन तांब्यामधे पाणी आणले. अर्जुनाच्या तोंडात थेंब-थेंब पाणी सोडलं आणि नाना त्याला विचारु लागला.
"आर्जुना काय रं झालं ?".
अर्जुन," लैऽऽऽऽ पोटात दुखतया नानाऽऽ, पायबी लय दुखतोयाऽऽऽ. आग पडलीयाऽऽऽऽ पोटात.."
अर्जुना त्याला जमेल तेवढ्या मोठ्या आवाजत विव्हळण्याचा प्रयत्न करीत होता. अर्जुना कन्हत होता.
"आई बा ला काय झालयं रं तुझ्या ",नाना.
अर्जुन, "लै हातपाय झाडत होती दोघं, मग पार शांत झाले, मलाबी काय तरी चावलय पायाला. लै चुन-चुनतयाऽऽऽऽ. ओ नानाऽऽऽऽ बघाना वोऽऽऽ".
नाना,"आरंऽऽऽऽ , भो**च्या होऽऽ. गर्दी करुन हुभ राह्यलया. आत खोपटात बघा की काय हालचाल हाय का?"
दोघे-तिघे घाईने खोपटात गेले, परश्याचे आणि त्याच्या बायकोचे हातपाय कसेबसे सरळ केले. तिथल्याच एका पोत्याचे सुत काढुन परश्याच्या नाका समोर धरलं;
तसंच सुत परश्याच्या बायकोच्या नाकासमोर धरलं; कसलीही हालचाल नाही म्हंटल्यावर दोन बायकांनी टाहो फोडला. सा-या बायका, बापे, लहान मुले, वस्तीवर बांधलेली गुरे, दारात फिरणा-या कोंबड्या आणि एकूणच सा-या मळ्याच्या नजरेने खोपटाचा वेध घेतला. सकाळचा मळ्यावरच्या वस्तीवर फिरणारा प्रसन्न वारा आज मात्र वातावरणाला चांगलाच झोंबला होता. मळ्यावरची वस्ती परश्याच्या खोपटापुढे जमा झाली. दोघांची प्रेते लोकांनी खोपटाच्या दारात ठेवली. वस्तीतल्या बायकांनी त्या दोघांचा ताबा घेतला आणि अक्षरश: मोठ्या आवाजात रडगाणं चालू केले. सगळ्या पुरषांनी तिथेच गराडा घातला आणि दोन पायावर बसले. कोणी तंबाखु काढली, कुणी बीड्या पेटवल्या, कुणी बळेच डोळे पुसायला सुरवात केली. तर कुणी आपल्याच पायाच्या अंगठ्यानी जमीन टोकरत परश्याच्या बायकोच्या गळ्यातल्या गंठणाचं काय करायच असा विचार करत खाली मान घालुन बसले. तिथूनच काही पावलं अंतरावर नाना अर्जुनाच पाय चोळत बसला होता. हा सगळा प्रकार बघुन नानाने ओरडायला सुरवात केली.
"आरं तुमच्या आयला होऽऽऽऽ, थोबाड घीऊन बसलायसा, डॉक काय वढ्याला गेलय व्हय ईरड करायला"
सगळेजण जागेवरुनच मान मागे करुन नानाकडे बघायला लागले. नानाचा पारा आता वाढला होता. अर्जुनाची नजर जड होत होती. तो अस्पष्ट आवाजात कण्हत होता.
नाना," आरंऽऽऽऽ,इंदलकराला बोलवा, मुकादमाला सांगा, त्यांच्या ताब्यात मढी द्या आणि पहीलं अर्जुनाकडं बघा. पोरात जीव हाये. वाचवायला पायजे, उठा लौकर, हाला बिगीबिगी"
तसे दोन गडी उठले आणि इंदलकरांच्या वाड्यावर जायला निघाले. बायका परश्याच्या खोपटात गेल्या आणि आतमधुन दोन फाटके रग आणले. काही माणसांनी त्या फाटक्या रगानी परश्याचे आणि त्याच्या बायकोचे प्रेत झाकले . सगळेजण नानाकडे धावले. सगळ्यांनी नानाकडे बघून न बोलता एक प्रश्न एकसाथ विचारला होता.
तो म्हणजे, "आता काय करायचं? परश्याचं काय करायचं?"
नाना, "मला काय अर्जुनाचं खरं वाटाना गड्यांनो, पोराचा पाय काळा पडलाय. कीडुक चावलय पायाला. कायतरी करायला पायजे. अर्जुना वाचायला पायजे".
भिका नावाचा सालदार हळुच नानाला म्हणाला, "नाना खरं तर बोलणं बरं नाय पण कुणीतरी बोलायलाच पाह्यजे. अर्जुन जरी वाचला तरी बी त्याला संभाळायचा कसा. आपल्याला रोज हाता-तोंडाची गाठ पाडायला रगात पडपर्यंत काम कराया लागतया. त्यात आजुन एक त्वांड घरात ठिवायचं म्हनजी पोटावर आणि कपाळावर बी पाय ठीवल्यासारखं झालय".
त्याच बोलण तोडतच उत्तम सालदार बोलायला लागला, "व्हय नाना बराबर हाये भिकाच,आणि पोरगबी मोठ नाय. पाच-सात वर्षाच असल. मोठ आसतं तर ज्याच्या घरात राहील त्याच्याकडनं मळ्यात सालदार गड्याच आपल्यावाणी गुरासारख काम केल असत. ज्याच्या घरात हाये त्याला चार पैक तरी भ्यटल असत. पण तस बी नाय ना वो. म्या तर म्हणतो त्यो मुकादम यायच्या आत परश्याच्या बायकुच्या गळ्यातला गंठण काढुन घ्या. आता सगळ शेवटचं करायचयं धाव्या दिसापर्यंत. आपुन कुठुन आणायचा पैका. त्या मुकादमाचा असाबी परश्याच्या बायलीवर डोळा व्हता. त्यो भाड्या आल्या-आल्या तीच्या गळ्याला हात घालल गंठण काढायला".
सगळ्यांनी एका स्वरात "व्हय व्हय" म्हणायला सुरवात केली. पटकन एक बाई उठली आणि परश्याच्या बायकोची मान उचलुन तिच्या गळ्यातील चार मन्यांचा गंठण काढुन घेतला, आपल्याच साडीच्या पदरात बांधुन ठेवला आणि आपल्या जागेवर जाउन बसली. नाना अर्जुनाच्या केसातुन हात फिरवायला लागला. अर्जुनाच डोळे मिटले होते. त्याच्या बंद ओठातुन त्याचा हुंकार ऎकु येत होता. त्या इवल्याश्या पोराच्या नाकावर आणि ओठावर माश्या बसत होत्या पण अर्जुनाकडे तेवढे त्राण नव्हते की त्या माश्या तो हटकुन लावेल. नाना अर्जुनाचा तोंडावरुन हात फिरवताना माश्या हटकु लागला. त्याच्या निळ्या रंगाच्या सद-याची बटण तुटली होती, त्याच शर्टाने त्याच्या तोंडातुन येणारी लाळ नाना पुसत होता. अर्धमेला जीव नानाच्या मांडीवर डोके ठेऊन आपल्या जगण्याची लढाई लढत होता. कायमच दारिद्र्या नशीबी असल्याने अर्जुनाच्या अंगात चड्डीचा पत्ता नव्हताच. कोणाचा तरी मागुन आणलेला अंगापेक्षा मोठा सदरा त्याच शरीर झाकायच काम करत होता.
अर्धमेल्या अर्जुनाकडे बघत नाना चेतुन ऊठला," आरं द्वाडा होऽऽऽऽ, माणसाच्या जीवापरीस पैश्याचं मोठपण आलय तुम्हाला. म्या संभाळतु अर्जुनाला. तस बी म्या एकलाच भिकार, आसु द्या माझ्या जोडीला".
भिका, "आरं नाना, जमनार हाये का तुझ्यानी? तुझच वय झालया आता".
नाना,"मग काय जीव घ्यायचा का पोराचा. आर माणस हात का राकीस?"
सगळेजण शांत झाले होते. कोणी मान वर करुन बोलायला तयार नव्हते.
नाना,"कसला इचार करताय बांडगुळा हो. जावा पटदीशी आप्पा मांत्रिकाला बोलवा गावातुन. साप, ईचु त्यो उतरावतो म्हणत्यात".
उत्तम,"आवं पण अजुन इंदलकर नाय आलं. मुकादम बी न्हाय".
नाना, "आरं मालक आन मुकादम आल्यान काय अर्जुना उठुन बसणारे व्हय".
सगळ्यांना नानाचे बोलणे पटले. पटकन सायकल काढुन एक सालदार आप्पा मांत्रिकाला आणायला गेला आणि नाना अर्जुनाच्या तोंडावरच्या माश्या हटकत राहीला.
अतिशय मळलेले पंचासारखे नेसलेले धोतर, पांढ-या रंगाची कोपरी. दंडाला लाल-भगव्या रंगाचे धागे बांधलेले. गळ्यात कवड्यांच्या आणि रुद्राक्षाची माळ. काळ्या दो-यात बांधलेल्या छोट्या-छोट्या पेट्या गळ्यामधे लटकत होत्या. खुरटी दाढी आणि ओठ-तोंड पान-सुपारीमुळे पुर्ण लाल. डोक्यावर तेलकट गांधी टोपी आणि कपाळावर गुलाल आणि बुक्क्याच्या पट्ट्या. वय थोडं जास्त झाल्याने कमरेत झुकुन झपझप चालत हातात पिशवी आणि गाडगं घेऊन आप्पा मांत्रिक आला. अर्जुनाकडे न जाता सरळ त्याच्या
आई-बापाकडे गेला. त्यांच्या अंगावरचे रग ऊचलुन कुठे-कुठे काय बघत होता ते कोणालाही कळाल नाही आणि पटकन अर्जुनाकडे आला, त्याचे पाय नीट बघत आपल्या घोग-या आवाजात बोलायला सुरवात केली,"आर...आर..! गड्या हो. हे काय साध सुध दिसत नाय. वेगळच जनवार दिसतया".
नाना, "आप्पा महाराज,किडूकच होत. आम्ही सगळ्यांनी बघीतलया".
आप्पा,"व्हय रं बाबा. सापच हाये पण ह्यो बांधावरचा दिसतुया. चुकलया काय तरी. सा-या घरादारावर ऊठलया."
नाना आश्च्यर्याने," बांधावरचा म्हंणजी? म्हसुबाचा म्हणताय काय?"
आप्पा,"व्हय म्हसोबा. बांधावरचा म्हसोबा. काय तरी द्वाड केलया त्याला तुम्ही".
आप्पानी अर्जुनाला ऊचलले आणि ’उगवती-मावळती’ कडे पाय आणि डोके केले. पिशवीतुन अंगारा काढला. अर्जुनाच्या कपाळाला लावला. नाकापुढे धरला.अर्जुनाचा श्वास चालु होता. गाडग्यात हात घातला आणि तोंडातली तोंडात मंत्र म्हणायला लागला आणि जोरात ओरडला "यस देर भैरवनाथाऽऽऽऽ".
गाडग्यातल पाणी एका हातात घेतल. अर्जुनाच्या ओठावर त्या पाण्याचे थेंब पाडले. आपल्या एका हाताने अर्जुनाचे तोंड जबरदस्तीने उघडुन हातातले पाणी तोंडात सोडले. ओला हात अर्जुनाच्या तळव्याला आणि पायाला काहीतरी पुटपुटत चोळला. आपल्या दंडाचा एक लाल दोरा काढला आणि पिशवीमधून एक छोटी तांब्याची डबी बाहेर काढली. डबीमधून सापाची कात काढली आणि त्या लाल दो-यामधे बांधली. तो लाल दोरा अर्जुनाच्या ज्या पायाला साप चावला होता त्या पायाच्या मांडीला आवळुन बांधला, आप्पा मोठ्याने बोलु लागला," म्हसोबाचा आणि भैरवनाथाचा निवद करा. आंड, चिलीम, भात, गुळ, त्याल,शेंगदाणं घेउन या". असं म्हणत आप्पाने एका पुडीतुन कुंकु हातावर घेतले.
अर्जुनाला कुंकु लावलं. चारही बाजुला फुंकलं आणि अर्जुनासमोर डोळे मिटुन काहीतरी पुटपूट्त बसला.नाना आणि दोन-चार बायका खोपटांमधे गेले. आप्पा मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे सगळा नैवेद्य गोळा करुन आणला. सगळेजण अर्जुनाकडे आणि आप्पाकडे टक लावून बसले होते पण दोघांच्या मुद्रेमधे काहीच फरक नव्हता. फरक होता तो फक्त म्हणजे अर्जुन हळुहळु काळसर होत चालला होता. काही वेळाने आप्पाने डोळे उघडले आणि अर्जुनाकडे बघितले. पुन्हा पहिल्याप्रमाणे पाणी पाजले. अर्जुनाच्या प्रतिक्रियेची वाट बघत बसला आणि घाई करायला लागला, "गड्या हो! चला लवकर. निघा. कोणत्या बांधावर म्हसोबा हाय तिथं चला. ह्या पोराला बी घ्या".
सगळ्यांमधला एकजण म्हणाला, "मागच्या हाप्त्यात धाकल्या मळ्यात परश्यान नांगर चालवला तवा त्यानी बांधावर नांगर घातला आणि म्हसुबाला मातीखाली गाडला. तव्हाच म्या त्याला म्हणल व्हतं. बांधावरचा देव हाय. कोपल. पण खोपडीच्या नशेत गड्याने थट्टा केली".
नाना," चला बीगीबीगी धाकल्या मळ्यात. पोराला ठेऊ तिथं. घाराण ऐकतुच की देव."
अर्जुनाला नानाने पाठीवर घेतले होते. त्याच्या जोडीला आप्पा मांत्रिक चालत होता आणि त्यांच्या मागे सगळी वस्ती चालत होती. सगळ्या बायका वस्तीवरच थांबल्या. तेवढ्यात इंदलकराला आणि मुकादमाला बोलवायला गेलेले गडी सगळ्यांच्यात सामिल झाले आणि म्हणाले, "मालक त्याच्या बारक्या पोराला घेऊन कुठतरी गेल्यात. मुकादम म्हणाला व्हा पुढ. आलुच".
सगळी वस्ती धाकल्या मळ्याची ढेकळ तुडवत आणि ठेचकळत चालत बांधावर पोहचले. जाणकरांनी म्हसोबाची जागा शोधली. ढेकळांखालून म्हसोबाची शेंदुर लावलेले दगड बाहेर काढले. पाणी टाकल. चिलीम ठेवली. तंबाखु भरली. अंड ठेवल. तेलाच दिवा लावला. भात ठेवला आणि त्याच्या समोर अर्जुनाला झोपवले. नानाने म्हसोबाला लोटांगन घातले आणि म्हणाला, "म्हसोबाच्या नावान चांगभलऽऽऽऽ. चुकलं-माकलं पदरात घ्या देवाऽऽऽऽ. बारक्या जिवाला सोडा. पोराच्या नावानं कोंबड चढवतो पण आई-बापाच पाप पोराच्या टाळूवर नका मारु देवा. येत्या आमुश्याला कोंबड लावतो देवा"
थोडावेळ लोटांगण ठेऊन नाना ऊठला आणि आप्पाने सुध्दा नानासारखीच देवाची प्रार्थना केली. सा-या वस्तींच्या पुरुषांनी पाया पडायला सुरुवात केली. तिथेच सगळे बांधावर अर्जुनाकडे बघत बसले. आता मात्र वेळ बराच झाला होता. सकाळच ऊन चांगलच तापायला लागलं होत. सगळ्यांच्या कपाळातुन घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या पण नजरा मात्र अर्जुनावर खिळल्या होत्या. अर्जुनाची हालचाल कमी झालि होती आणि तापत्या ऊन्हामुळे मानेला झटके द्यायला अर्जुनाने सुरुवात केली होती. आप्पा ऊठला आणि बोलु लागला,"गड्या हो! देवाच्या मनात काय हाये कळत नाय. पोराला भैरोबाच्या गाभा-यात सोडु. शेवटाला सा-या गावाचा, देवाचा आणि राना-मळ्याचा राजा त्योच्च".
नानाने अर्जुनाला खांद्यावर घेतले आणि सगळे पुन्हा सार रान तुडवत कच्च्या रस्त्याला लागले. वेगाने गावात भैरोबाच्या देवळाकडे जायला निघाले. देवळापुढे गेले. आप्पाने आणि नानाने अर्जुनाला भैरोबाच्या त्या अंधा-या गाभा-याकडे नेले. भल्या मोठ्या मंदीरामधे काळ्याकुट्ट अंधाराने गच्च भरलेला गाभारा. तीन फुटाच्या दगडी चौकटीचा दरवाजा ओलांडून एक फुट खाली उतरले की गाभा-याची थंडगार फरशी पायाला लागली. सा-या गाभा-यात तेलकट वास सुटला होता. भैरोबाची मूर्ती मंदिरात कुठे आहे ते त्या भयाण अंधारात समजत नव्हत.गाभा-यातल वातावरण ब-यापैकी थंड होत तरी सुध्दा नानाचे कानशील गरम झाले होते.त्याची धडधड वाढली होती. आप्पा आणि नाना दोघही त्या अंधा-या गाभा-यात चाचपडत होते, एकमेकाला धडकत होते आणि त्याच अवस्थेमधे अर्जुनाला संभाळत होते. आप्पाने आपल्या कोपरीतुन कड्याची पेटी काढली आणि पेटवली. त्याच प्रकाशात भैरोबाचा दिवा शोधला. त्यात तेल घातल. जुनी वात पुढे सरकवली आणि पेटवली. अंधा-या गाभा-यात अंधुक प्रकाश झाला. हा मंद प्रकाश मात्र भिती दाटवत होता. ह्या अंधुक प्रकाशात भैरोबाची काळ्या पाषाणातली ऊभी दोन फुटाची मूर्ती दिसत होती. त्याच्या समोर पडलेल्या खोब-यच्या आणि गुळाच्या तुकड्यांवर मुंगळे फिरताना दिसत होते. देवाचे पाय नानाने धुतले आणि त्याच चौथ-यावर अर्जुनाला झोपवला. नाना देवासमोर आता जोरजोराने रडायला लागला. रडतच नाना अर्जुनासाठी जीवदान मागत होता. अर्जुनाचा श्वास चालु होता. आप्पाने नानाला बाहेर पाठवले. पाच मिनिटांमधे आप्पा बाहेर आला.
सगळेजन हात जोडुन कोणी मांडी घालुन तर कोणी दोन पायावर मंदीरामधे बसले होते. अर्जुना गाभा-यात भैरोबाच्या पायाशी विसावला होता. आतमधे फ़क्त काळ्या पाषाणातील भैरोबा आणि काळा पडत चाललेला अर्जुन दिव्याच्या अंधुक प्रकाशात दिसत होते. सर्वजण खाली मान घालुन बसले होते. आप्पा गाभा-याकडे बघत होता. नानाच्या दोन्ही डॊळ्यातुन पाण्याच्या धारा चालु होत्या. बरेच जण मात्र आपली मळ्यातली काम रखडली ह्या विचारात होती. बराच वेळ झाला मंदिरात अजून शांतता होती. सगळ्यांचे लक्ष एका आवाजाने वेधले. फटफटीचा आवाज येत होता. मालक येत असल्याची चाहुल सगळ्यांना लागली. सगळेजण मनातून सावरुन बसले आणि नजर गाभा-याकडे लावली. फटफटीचा आवाज स्प्ष्ट होत गेला आणि तो अगदी जवळ येऊन थांबला. मालकाची फटफटी मंदिरासमोर येऊन थांबली. सगळेजण उभे राहीले. फक्त नाना आणि आप्पा जिथे होते तिथेच बसुन राहिले. मालकाच्या मागेमागे स्वत:चे कपडे सावरत रंगीत पँट शर्ट घातलेला मुकादम गडबडीने पुढे येत होता. दणकट शरीरयष्टीचा, घोळदार पायजमा आणि पांढ-या खादी शर्टामधे रुबाबदार चाल ठेवत इंदलकर एकाहातात छोटी बॅग आणि गाडीची किल्ली घेऊन मंदीरात आला. गड्यांशी बोलायला लागला. आप्पा आणि नानांनी काही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. मग त्यांना आपल्या विशेष मालकी आणि करड्या आवाजात त्यांना बोलावले आणि म्हणाला, "आप्पा. किती येळ झाला".
आप्पा, "पहाटपासुन हाये बहुदा".
इंदलकर, "मग कस आता?"
आप्पा, "देवालाच माहीत".
इंदलकर, "ओय नानाऽऽ. परश्याची आणि त्याच्या बायकुची मैत करायला लागंल. मुकादम नानाकडे पैस द्या. नाना दोन दिसात वस्तीवरचा सुताक संपवा. लै कामाचा खोळांबा होतुया".
मुकादमाने मालकाच्या हातातली बॅग घेतली आणि त्यातुन पैसे काढून मोजायला लागला.
नाना, "व्हय जी मालक. आता जीव जायचा म्हणल्यावर..."
नानाच बोलणे मधेच तोडत इंदलकर म्हणाला, "समद माहीती हाये नाना. माझं धाकट पोरग काल खेळताना पडलं, त्याला तालुक्याला दवाखान्यात नेलाय. तिकडच असतु मी सारा हप्ता. मला जास्त येळ नाय लक्ष ठिवायला. त्यामुळं सुताक संपवायचं दोन दीसात."
नानासह सगळेजण "व्हय मालक" म्हणाले.
नानाच्या मनात विचार आला, ’पैका असता तर आपन आत्ताच अर्जुनाला दवाखान्यात नेला असता. पण म्या पडलो म्हतारा आणि वस्तीत कुनालाच उल्हास नाय’.
तेवढ्यात इंदलकर पायतल्या वहाणा न काढताच गाभा-यापर्यंत हातातली किल्ली फिरवत गेला. आतमधे डोकावले आणि म्हणाला, "आप्पा देतोय का नाय भैरोबा कौल बघा जरा"
असं म्हणून इंदलकर आणि त्याच्या मागोमाग त्याचा मुकादम निघाला. मुकादमाने जाता-जाता दहाच्या नोटांचे बंडल नानाकडे दिले. सगळेजण मालकाच्या मागे चालायला लागले. नाना सोडून बाकीचे सगळे सालदार मनातून खुष झाले होते. मयतीचा-सुतकाचा पैका मालकाने दिला होता. सगळ्यांच्या मनात आता एकच गोष्ट होती ती म्हणजे त्या पदराची गाठ ज्यामधे परश्याच्या बायकोचे गंठण बांधले होते. गंठण विकून वाटून घेऊ असा विचार सगळ्यांच्याच मनात होता.
इंदलकर गाडी जवळ थांबला. बॅगमधुन कागदात बांधलेला पानाचा विडा काढला. विड्याची अजुन एक घडी करुन पान तोंडात घातले. त्याच कागदावर दोन बोट फिरवून त्याने कागदावरचा जास्तीचा आणलेला चुना उचलला. स्वत:ची जीभ बाहेर काढून तो चुना जीभेच्या दोन्ही कडेला लावला आणि त्या चुन्याचअ आणि विड्याचा तोंडात एक प्रकारचा जाळ करुन इंदलकर सगळ्यांना उद्देशुन बोलायला लागला, "सुताक दोन दिस असलं तरी उद्या रातच्याला चौघं-पाच जण रानात पाण्यावर जा. म्या आता तालुक्याला चाललोय. पोरग हाय माझ तिकड".
बोलत असताना त्याच लक्ष मंदीरातल्या गाभा-याकड गेलं आणि म्हणाला, "आरं कुत्र चाललय बघा आत. हाकला त्याला".
मागच्या मागेच भिका गाभा-याच्या दारात गेला आणि कुत्र्याला हाकलून परत मालकाच्या समोरच्या घोळक्यात परतला. मालक निघाला तेंव्हा भिका नानाला म्हणाला,
"नाना दिवा इझलाय वो आतला. दिसत नाय आतमधी काय बी".
हे ऐकताच नानाच चेहरा जागेवर थिजला. त्याने आप्पाकडे बघितले. आप्पाने स्वत:च्या खिशातली काडेपॆटी नानाला दिली. नानाने हातातले पैसे भिकाकडे दिले. नाना घाई-घाईने गाभा-याकडे गेला. सगळेजण नानाच्या मागेमागे जाऊन गाभा-याच्या बाहेर उभे राहिले. नानाने अंधा-या गाभा-यात प्रवेश केला. काडी पेटवली. दिवा लावला तसा त्या अंधारामधे गंभीर मंद प्रकाश पसरला. काळ्या पाषाणातल्या भैरोबासमोर अर्जुन जसा ठेवला होता तसाच पडला होता. नानाने त्याच्या कपाळावर हात फिरवला. अर्जुन थंड पडला होता. नानाने आशेने त्याचा पाय चोळण्यासाठी ऊचलला आणि त्याच वेळेस नानाच्या हातून अर्जुनाचा पाय गळाला. नानाने पटकन अर्जुनाल दोन्ही हातामधे ऊचलला आणि अचानक एखादा बांध फुटावा तसा नाना देवासमोर मोठ्मोठ्याने रडून अर्जुनाचा काय चुकल विचारत होता. आप्पा नानाकडे काडीपेटी देऊन तसाच मागे फिरला होता. लोक त्याला पाठमोरा खाली मान घालुन चालताना पहात होते. अर्जुन सुध्दा गेला होता. नाना दोन्ही हातावर अर्जुनाला घेऊन गाभा-याच्या बाहेर आला आणि सगळ्यांकड बघुन म्हणायला लागला,
"अर्जुन गेला रऽऽऽऽ.... कुणी नका संभाळु ह्याला... त्यानी त्याची सोय केलीया... मलाबी नाय संभाळणार त्यो आता..."
सगळेजण मान खाली घालुन बसले होते; पण ह्या वेळेस सगळ्यांच्याच डोळ्यातुन पाणी येत होतं. गाभा-याच्या दारात शेवटी झाला तो अश्रुंचा अभिषेक आणि गेला तो अर्जुनचा बळी.
सापाचा दंश परश्याच्या घरालाच नाही पण सा-या वस्तीच्या गरिबीला झाला.
हा प्रसंग म्हणजे त्या वस्तीतल्या प्रत्येक सालदार गड्याच्या आयुष्याला झालेला सर्प्'दंश' होता.
धन्यवाद,
______मनस्वी राजन